बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग
1 min readबृहन्मुंबई महानगरपालिका
दिनांक २७ मार्च २०२६
मुंबईच्या शाश्वत विकासासाठी भूजल व्यवस्थापन, नियोजन गरजेचे
‘केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग’ या विषयावरील कार्यशाळेत वैज्ञानिकांचे मत*
पाण्याचे नैसर्गिक स्रोत, भूगर्भातील पाण्याचा साठा, भविष्यासाठी त्याचे नियोजन आणि व्यवस्थापनावर बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक २७ मार्च २०२७) बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय अधिनस्थ केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. उपेंद्र धोंडे यांनी भूजलाची माहिती दिली. भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कसा करायचा यावर आजच्या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती अश्विनी जोशी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत महानगरपालिका उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) श्री. अविनाश काटे, उप मुख्य अभियंता श्री. अजय राणे यांच्यासह बैठकीस भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग तसेच नियोजन विभाग, जल अभियांत्रिकी, पर्यावरण विभागासह विविध विभाग तसेच खासगी जल-पर्यावरण संस्थांचे एकूण ३१ प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि २५ प्रतिनिधी ऑनलाइन सहभागी झाले.
‘केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भांडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग’ या विषयावरील या कार्यशाळेत भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कसा करायचा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेत केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. उपेंद्र धोंडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे भूजल व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय माहिती प्रसारण धोरण यावर सादरीकरण केले. तसेच मुंबई महानगरासाठीचे राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत निष्कर्ष मांडले. देशभरात जमिनीखालील पाण्याचे साठे कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे तसेच समुद्रकिनारी भाग असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. उपेंद्र धोंडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासोबत भूगर्भात असलेल्या पाण्याचा वाढता उपसा कसा नियंत्रणात आणता येईल, प्रदूषणाचे प्रमाण कसे कमी करता येईल आदींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईचा बहुतांश भाग समुद्र किनाऱ्याचा आहे. येथील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका असल्याचेही श्री. धोंडे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या अटल भूजल योजना, जलशक्ती अभियान, जलसंचय जन भागीदारी, मिशन अमृत सरोवर आदी योजनांचीही यावेळी बैठकीत माहिती देण्यात आली.
भूजल माहिती प्रसारणामुळे क्षेत्रीय स्तरावर नियोजन व निर्णय प्रक्रियेला चालना मिळते, यावरही बैठकीत भर देण्यात आला. ‘कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महापालिका उप आयुक्त श्री. अविनाश काटे यांनी भूजल माहिती प्रसारामध्ये केंद्रीय भूजल मंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या डेटाबेसच्या वापरातून संबंधित विभागांमध्ये सुसंवादी आणि व्यापक धोरण राबविण्याची गरज व्यक्त केली. डॉ. सूर्यवंशी यांनी प्रभावी भूजल नियमनासाठी कायदे-नियम सुलभ करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यासोबतच कार्यशाळेत भूजल नियमन, जललेखा परीक्षण, किनारपट्टीवरील जलधर प्रदूषण या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय भूजल मंडळातील वैज्ञानिक श्री. संदीप वाघमारे यांनी केले.


