*बृहन्मुंबई महानगरपालिका*
*जनसंपर्क विभाग*
_दिनांक २८ मार्च २०२६_
*’नगर पथ विक्रेता समिती’ निवडणूक अंतर्गत मतमोजणी सुरु*
*मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार*
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी महानगरपालिका समिती सभागृह क्रमांक १ व २ येथे आज (दिनांक २८ मार्च २०२६) शांततेत आणि सुरळीतपणे सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक मुख्य समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या सदस्य पदांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया होत आहे.
आज (दिनांक २८ मार्च २०२६) परिमंडळ १, २ आणि परिमंडळ ४ ची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित परिमंडळांची मतमोजणी अद्याप सुरू आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.
दुपारी १२ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सर्व १३६ मतपेट्या बाहेर काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या जवळपास २०० ते २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने आज दुपारी १२ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू केली.
सर्वप्रथम मतदान पत्रिकांची आरक्षणनिहाय विभागणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी उप आयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, अनुज्ञापन अधिक्षक श्री. अनिल काटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. त्यात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. माननीय न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले होते.
सोमवार, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने (याचिका क्रमांक २९३३९/२०२४ व इतर) या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. माननीय न्यायालयाने सन २०२४ मध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया ‘विधिग्राह्य’ ठरवत, मतमोजणीवरील स्थगिती उठवली आहे. तसेच, विनाविलंब निकाल जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार आज मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत/ पहाटेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे.


